दुष्काळ सदृष्य परिस्थितीमध्ये फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा कार्यक्षम वापर
भारतातील व प्रामुख्याने महाराष्ट्रातील अन्नधान्याचे उत्पादन आणि उत्पादकता कमी असण्याच्या मुख्य कारणामध्ये आपल्याकडील बदलते हवामान कमी झालेली जमिनीची सुपिकता, खत आणि पाण्याच्या नियोजनाचा अभाव यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
आधुनिक शेतीमध्ये सुधारित – संकरित बियाण्याचा वापर, माती परिक्षणानुसार एकात्मिक अन्नद्रव्याचा वापर, ठिबक/तुषार माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर, पीक संरक्षण आणि बदलत्या हवामानानुसार आपत्कालीन पीक नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास निश्चित अधिक दर्जेदार उत्पादन मिळू शकते.
महाराष्ट्रात फक्त १८ टक्के क्षेत्र बागायती खाली असल्याने, कोरडवाहू क्षेत्रामधूनच अधिकाधिक उत्पादन काढणे महत्वाचे ठरते तेव्हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम खुपच महत्वपूर्ण असतो. मागील दोन ते तीन वर्षातील दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आणि अवकाळी पाऊस व इतर नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हैराण झाला आहे.
ह्यावर्षी जूनमधील सुरुवातीस आलेल्या पाऊसाचा पुरेपुर वापर करून घेण्यासाठी शेतकरी बांधवानी, जमिनीच्या पूर्वमशागती बरोबर पेरणी उरकण्याचा प्रयत्न केला. स्वत:कडे असणारे बी-बियाणे तसेच विकतचे महागडे बियाणे यांचा वापर केला. पिकांची चांगली उगवण व सुरुवातीची जोमदार वाढ व्हावी या उद्देशाने बीज प्रक्रिया केली. त्यामध्ये रोगनाशकाशिवाय जीवाणू खतांचा म्हणजेच द्विदल धान्य पिकांसाठी रायझोबियम तर एकदल पिकासाठी अझोटोबॅक्टर बरोबर स्फुरद विरघळणारे जीवाणू (पी.एस.बी) खतांचा वापर केला. पिकाची उगवण व वाढीला सुरुवात होते ना होते तोच पावसाने मोठी विश्रांती घेतली. त्यात वाऱ्याचा वेग व तापमान वाढल्यामुळे, जमिनीतील ओलावा कमी झाला. पाऊस पडण्या, अनुकूल वातावरण नसल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. अंशत: ढगाळ हवामान असल्याने ढग येतात व निघून जातात पण पाऊस पडत नाही. पिके हातची जातात की काय, दुबार पेरणी करावी लागणार की काय अशा काळजीत शेतकरी वर्ग सध्या आहे.
ज्या ठिकाणी शेती केवळ पावसावर अवलंबून आहे आणि सिंचन सुविधा नाही अशा परिस्थितीत, बुडत्याला काठीचा आधार म्हणून जमिनीतील पिकांच्या मुळाच्या खालील थोडीफार ओल उचलुन घेण्याची ताकद पिकांना येण्यासाठी, पिकांना प्रथम सशक्त करणे गरजेचे आहे. पिकांना पानावाटे पोषक आहार देवून, मुळाची ताकद वाढवून ती अधिक खोलवर नेवून, जमिनीतील ओलावा खेचून वाढ करून घेता येते. त्यासाठी सर्व पिकांना वाढीच्या अवस्थेनुसार ०.५ ते १ टक्का नत्र, स्फुरद व पालाशयुक्त खते ५० ते १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात विरघळवून पानावाटे देणे अतिशय गरजेचे आहे. एकरी १५० ते २०० लिटर पाणी लागते त्यासाठी बाजारात अनेक विद्राव्य खते उपलब्ध आहेत.
दीपक फर्टिलायझर कंपनीने महाधन अमृता नावाने खालील विविध खते बाजारात उपलब्ध करून दिलेली आहेत, व त्याचा वापर शेतकऱ्यानी जरूर करावा.
अ.क्र. | विद्राव्य खतांचा प्रकार | पीक अवस्था |
---|---|---|
१. | १९:१९:१९ | वाढीच्या अवस्थेत |
२. | १२:६१:०० व कॅल्शिअम नायट्रेट | फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना (वेगवेगळी द्यावीत) |
३. | ००:५२:३४ व १३:४०:१३ | फलोरा ते फळ धारणेच्या अवस्थेत (वेगवेगळी द्यावीत) |
४. | १३:००:४५ व ००:००:५० | फळ वाढीच्या अवस्थेत असताना (वेगवेगळी द्यावीत) |
पाऊस जरी कमी जास्त झाला तरी पिकांना आधार देण्याचे कार्य ही खते करणार आहेत.
वरील सर्व खतांचे प्रमाण ०.५ ते १.० % प्रमाणे ठेवावे. (५० ते १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) फवारणी सकाळी तसेच संध्याकाळी वाऱ्याचा वेग व कमी सुर्यप्रकाश असताना करावी.
बऱ्याचदा अन्नद्रव्यांची पिकांना उपलब्धता ही जमिनीचे तापमान, ओलावा, हवामानातील बदल, सामू, चुनखडीचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब इत्यादी बाबींवर अवलंबून असते. अशा प्रतिकूल परिस्थितीत पिकांवरील पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा ताण हा पीक पोषणावर व वाढीवर अनिष्ट परिणाम करीत असतो. एखाद्या आजारी माणसाला सलाईन वाटे टॉनिक देवून त्याचा थकवा, अशक्तपणा कमी केला जातो त्याचप्रमाणे, पिकाची वाढ मर्यादित कालावधी मध्ये कमी झाली असेल तर त्यास आधार देण्यासाठी आणि तग धरून ठेवण्यासाठी, थोडेसे टॉनिक म्हणून अन्न व पाणी पिकांना, पानावाटे देणे अति महत्वाचे आहे. त्यामुळे बदलत्या हवामानात पीक तग धरून वाढत राहते. पिकामध्ये प्रतिकारशक्ती वाढते व पीक कीड व रोगास कमी बळी पडते. व अधिक गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते. केवळ एक फवारणी करून चालणार नाही तर वेळप्रसंगी १५-२५ दिवसांनी पिकांच्या वाढीनुसार, खतामधील मुख्य, दुय्यम आणि सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे गरजेचे आहे.
फवारणीद्वारे देण्यात येणाऱ्या खतांचे प्रमाण कमी असल्याने खर्च कमी येतो व ती अधिक फायदेशीर ठरतात. शिवाय अशा संक्रमण परिस्थितीतून निभावून नेण्यासाठी, विद्राव्य खतांचा वापर करणे हितावह ठरते. त्यांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी द्रावणामध्ये स्टीकर वापरतात. खते पानावर विस्तारून चिकटून जास्त वेळ राहिल्यास, पानावाटे अन्नद्रव्ये शोषून घेण्यास मदत होते. विद्राव्य खतामध्ये चिलेटयुक्त सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा बाजारात मिळतात. त्यांचा वापर पीक वाढीच्या दुसऱ्या अवस्थेत करावा परंतु पेरताना जरी जमिनीतून मुख्य खते दिली असली तरी ओलावा मर्यादित असल्याने ती पिकांना घेता येत नाहीत. त्यासाठी सुरुवातीस, मुख्य अन्नद्रव्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश तसेच मॅग्नेशियम, गंधकाचा वापर करावा व आपत्कालीन परिस्थितीवर मात करावी.
Written by – विजयराज पाटील, सहयोगी उपाध्यक्ष, दीपक फर्टिलायझर्स, पुणे