फवारणीची खते देण्यासाठी हीच योग्य वेळ!
शेतीशास्त्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक फायदेशीर उत्पादन काढणे हे प्रत्येक शेतकऱ्याचे ध्येय असले पाहिजे. ह्यावर्षी थोडा उशीर परंतु बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असला तरी पीक हातात येईपर्यंत त्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. १८४३ सालापासून, पिकांवर फवारणीच्या खतांचा होणारा परिणाम अभयासनाचे काम ग्रीस या शास्त्रज्ञाने चालू केले. उत्पादनाचे सातत्य आणि शाश्वत उत्पादनासाठी खतांची पिकांवर केलेली फवारणी अत्यंत उपयोगी ठरते. खूप पाऊस आणि कमी पाऊस पडल्यास पिके जमिनीतून हव्या त्या प्रमाणात अन्नद्रव्ये घेऊ शकत नाहीत. अशावेळी खतांची फवारणी परिणामकारक ठरू शकते. पानाचा आकार, खताची तीव्रता, हवेतील आर्द्रता, तापमान, पिकाचे वय, खताचा सामू वाऱ्याचा वेग असे विविध घटक फवारणी करताना शेतकऱ्यांनी विचारात घ्यावेत.
पावसाने चांगली साथ दिल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपून, पीक वाढीसाठी योग्य ती काळजी म्हणजेच शेतात साठलेले ज्यादा पाणी बाहेर काढणे, शेतातील स्वच्छता म्हणजेच तण, कीड व रोगराईचे निर्मुलन केले असेलच. अन्यथा त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने पडलेल्या पाण्याचा कार्यक्षमपणे वापर करण्यासाठी, सक्षम कोळप्याने जमीन हालवून, खुरपणीद्वारे तण बाजूला करणे गरजेचे आहे. त्यामुळे जमीनीत पिकांच्या सभोवताली हवा खेळती राहिल्याने, वाफसा अवस्थेत पिके ओलाव्यावर जमिनीतील असलेली मूळची व पेरणीवेळी दिलेली खते, कार्यक्षमपणे घेण्यास सक्ष्म होतात. तरीपरंतू वेळेअभावी, माती तपासणी शिवाय कमी अधिक प्रमाणात उपलब्ध खते दिल्यामुळे व कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांची वाढ समाधानकारक झालेली नसल्यास, निश्चितच आपली परिस्थिती “दात आहेत पण चणे नाहीत” अशी जाली असे समजावे. पिकांची सध्या तहान भागविली आहे परंतु कमी अदिक पावसाने पिकांची वाढ मात्र अपेक्षित जालेली दिसत नाही.
पिकांच्या जोमदार वाढीसाठी विविध खतांचे नियोजन आणि व्यवस्थापन खालीलप्रमाणे करावे.
आपणाकडे खरीप हंगामातील प्रामुख्याने तृणधान्ये – ज्वारी, भात, मका, बाजरी इ. तसेच कडधान्यामध्ये मूग, मटकी, उडीद, तूर तसेच गळीत धान्यामध्ये – सूर्यफूल, भुईमूग, सोयाबीन व कापूस, भाजीपाला व आडसाली ऊस इत्यादी नगदी पिकेही घेतली जातात. ह्या सर्व पिकांना पाण्यात पूर्णपणे विरघळणाऱ्या खतांचा आवश्यकतेनुसार वापर करणे अतिशय गरजेचे आहे. सर्वच पिके विविध अन्न द्रव्यांच्या कमतरतेची लक्ष्णे दाखवतातच असे नाही. ज्या पिकांमध्ये लक्षणे दिसतात तोपर्यंत २५-३०% नुकसान झालेले असते.
पिकाला एकंदरित मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळून १६ अन्नद्रव्ये लागतात. त्यांची एकूण गरज पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार कमी जास्त बदलत असते. हवामानातील बदल, जमिनीची सुपिकता, ओलाव्याची अवस्था, उपलब्ध अन्नद्रव्ये, पीक संरक्षण व व्यवस्थापन या सर्व बाबींचा पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर तसेच गुणवत्तेवर परिणाम होत असतो. हे ओळखून मे. दीपक फर्टिलायझर्स, पुणे ह्यांनी विद्राव्य खतांचा महाधन अमृता नावाने वेगवेगळ्या ग्रेडस् बाजारात उपलब्ध केल्या आहेत. त्यामध्ये १९:१९:१९, १२:६१:० (एम ए पी), ००:५२:३४ मोनो पोटॅशियम फॉस्फेट (एम. के. पी.), १३:००:४५ पोटॅशियम नायट्रेट, एस. ओ. पी. (००:००:५० + १८) कॅल्शियम नायट्रेट, १३:४०:१३, २०:२०:२०, २४:२४:० (स्मार्ट) इ। श्रृंखला आहे. ही सर्व खते पाण्यात संपूर्णपणे विरघळत असल्याने ठिबकद्वारे अथवा फवारणीद्वारे देता येतात. यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचाहि वापर करता येतो. ही सर्व खते पाण्यामध्ये गरजेप्रमाणे वरघळावीत परंतु खतात पाणी टाकू नये कॅल्शियमयुक्त पाण्यात इतर खते, किटक नाशके, बुरशीनाशके मिसळून देऊ नये.
विद्राव्य खताची तीव्रता फारच महत्त्वाची असते. सर्वसामान्यपणे सुरूवातीस बाल्य अवस्थेत (वाढीच्या सुरूवातीला) अर्धा टक्का, १ टक्का फुलोऱ्यापूर्वी व नंतर २ टक्के फुलोऱ्यानंतर तीव्रतेचे द्रावण एकरी २०० लिटर प्रमाणे पिकावर फवारावे. १ टक्का म्हणजे १०० लिटर पाण्यात १ किलो खत पूर्णपणे विरघळवून फवारावे. सद्यःपरिस्थितीत विविध पिकांची पेरणी संपून पीक वेगवेगळ्या अवस्थेत वाढत आहे. तेव्हा पीकामधील स्वच्छता कोळपणी / खुरपणी आणि कीटकनाशके किंवा बुरशीनाशके याचा वापर केल्यानंतरच विविध खतांचा वापर करावा. यामध्ये सुरूवातीस १९:१९:१९ महाधन अमृता १ टक्का तसेच फुलोऱ्यापूर्वी १२:६१:० किंवा ०:५२:३४ १ टक्का आणि फुलोऱ्यानंतर १३:००:४५ किंवा ०:०:५० फवारीद्वारे २ टक्के प्रवाणात वापरल्यास पिकाची जोमदार व गुणवत्तेदार वाढ होण्यास मदत होईल.
सुक्ष्मन्नद्रव्ये म्हणजेच जस्त, लोह, बोरॉन इ. यांची ०.५ टक्के तीव्रतेची फवारणी वरच्या फवारणीनंतर दोन दिवसांनी करावी. त्यामुळे उत्पादनाची प्रत सुधारून बाजारभाव अधिक मिळण्यास मदत होते. म्हणून शेतकऱ्यांनी सद्यः परिस्थितीचा विचार करून आलेल्या पिकामधून जास्तीत जास्त गुणवत्तेदार जोमदार उत्पादन घेऊन, अधिक फायदा करून घ्यावा. राज्यात काही भागात पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी सर्व आंतरमशागतीची व पीक संरक्षणाची कामे आटोपली असून पुढील येणाऱ्या पावसाची वाट पाहत आहेत. केवळ वरकरणी पिकाकडे न पाहता पिकांचे समतोल पोषण करावे.
खतांच्या फवारणीमधील महत्त्वाच्या बाबी व फायदे खालीलप्रमाणे
१. मिलालेल्या पावसाचा, ओलाव्याचा कार्यक्षणपणे सदुपयोग करून घ्यावा.
२. जमिनीतून दिलेल्या खताची कार्यक्षमता व उपयोग ५० टक्के च्या आसपास असल्याने पानावाटे विद्राव्य खतांचा जरूर वापर करा. आजारी व्यक्तीला अतिदक्षता विभागातून बाहेर काढणे म्हणजे विद्राव्य खतांची फवारणी करून पिकांची भूक व खोलवरच्या ओलीचा उपयोग करून पिकाच्या वाढीस चालना देणे.
३. विद्राव्य खतामध्ये फक्त युरीयाचा विचार न करता, दोन किंवा तीन अन्नघटक असलेली महाधन अमृता व चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यासारखी मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांचा वार करावा.
४. विद्राव्य खते प्रमाणात (०.५-१ टक्का) पाण्यात मिसळून स्वच्छ पंपाद्वारे फवारणी सकाळी ११ पर्यंत व संध्याकाळी ४ वाजेनंतर फवारणी केल्यास जास्त लागू होतात.
५. फवारणी करताना पाऊस व वारा नसावा व द्रावणांत स्टीकर १ मिली प्रति लिटर प्रमाणे वापरावे.
६. फवारणी द्रावणाची तीव्रता, पीक वाढीची अवस्था विचारात घेऊनच पाण्याचे प्रमाण कमी जास्त करावे.
फवारणीमुळे पिकामध्ये रोग, कीडी व पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते तसेच फुल व फळगळ थांबून फळधारणा चांगली होऊन संख्या, वजन, आकार व प्रत यात लक्षणीय वाढ होते. पिकामध्ये कोणत्याही कमतरता आढळल्यास फवारणीच्या सहाय्याने ती दूर करावी. आपत्कालीन उपाय योजना म्हणून फवारणीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकऱ्यांनी खतांची फवारणी सर्वच पिकांवर केल्यास अधिक जोमदार व दर्जेदार उत्पादन घेता येणे नक्किच शक्य आहे.