Mahadhan Fertilizers

सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा पीक उत्पादन वाढीवर आणि मानवाच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम

सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा पीक उत्पादन वाढीवर आणि मानवाच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम
August 7, 2017 Comments Off on सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा पीक उत्पादन वाढीवर आणि मानवाच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम Blog,Blogs Marathi admin

कृषी क्षेत्रात केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नातून अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला. मागील तीन दशकात तर शेतीच्या तंत्रज्ञानात आमुलाग्र बदल झाला आहे. देशात हरितक्रांती, श्वेतक्रांती, निलक्रांती घडून आल्या. एका बाजूला प्रगतीचे हे लक्षवेधी टप्पे गाठले असले तरी शेती उत्पादन वाढीच्या प्रयत्नात रासायनिक खते, किटक व रोग नाशके, तण नाशके यांच्या वापराकडे अधिक लक्ष देण्यात आले. सेंद्रिय खतांचा मर्यादित आणि कमी वापर, पाण्याचा अयोग्य वापर त्यामध्ये असमतोल वापर, जमिनीला न मिळणारी विश्रांती, जमिनीची धूप व निकसपणा, माती व पाण्याचे प्रदूषण, किटकांची वाढती प्रतिकारशक्ती, अनेक विविध मूलद्रव्यांचा असंतुलितपणा, क्षारपड आणि चोपण – पाणथळ जमिनीचे वाढते प्रमाण, निसर्गाचा असमतोल आणि प्रदुषण अशा अनेक समस्या सध्या निर्माण झाल्या आहेत.

विविध पिकांचे पोषण हे जमिनीकडून होत असते परंतु वर्षानुवर्षे एकापाठोपाठ पिके घेत असल्याने तसेच जमिनीचे मर्यादीत अन्नद्रव्याचे पूर्णभरण होत नसल्याने जमिन कुपोषित झाली आहे. जमिनीचे सर्वेक्षण आणि परिक्षण केले असता असे निदर्शनास आले आहे की, जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत असून, जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचा साठा कमी झाला आहे. भारतामध्ये जमिनीत नत्र (८९%), स्फुरद (८०%), पालाश (५०%) ची कमतरता आहे. तसेच जस्त (४९%), गंधक (४१%) बोरॉन (३३%), लोह (१३%), मंगल (१२%) आणि तांबे (५%) ह्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून आली आहे. तसेच सेलेनियम हे पंजाबमध्ये तर अर्सेनिक हे पश्चिम बंगाल मध्ये हानीकारक मर्यादेपेक्षा जास्त दिसून आले आहे.

महाराष्ट्रात सुद्धा इतर राज्यांप्रमाणे जवळपास सारख्याप्रमाणात अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते. उदा. जस्त (४५%), गंधक (४१%), लोह (२२.६%), बोरॉनची (२०.३%) कमतरता आढळून आली आहे. साहजिकच ह्या सर्व अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे व असंतुलीत खत वापरामुळे, पिकांवर विकृतीची लक्षणे दिसतात. त्यावर खालील प्रमाणे उपाय करता येईल.

तक्ता : अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे व त्यावरील उपाय

अन्नद्रव्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे उपाय
नत्र झाडाची खालची पाने पिवळी होतात मुळाची व झाडांची वाढ थांबते, फ्रुट व फळे कमी येतात. १% युरियाची फवारणी करावी.(१०० ग्रॅम + १० लिटर पाणी
स्फुरद पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागील बाजू जांभळट होते. १% डायमोनियम फॉस्फेटची फवारणी करावी. (१०० ग्रॅम + १० लिटर पाणी)
पालाश पानांच्या कडा तांबटसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखूड होवून शेंडे गळून पडतात. ०.५% हिराकसची अथवा फेरस अमोनियम सल्फेटची फवारणी करावी. (५० ग्रॅम + १० लिटर पाणी)
लोह शेंड्याकडील पानांच्या शिरामधील भाग पिवळा होतो. झाडांची वाढ खुंटते. ०.५% हिराकसची अथवा फेरस अमोनियम सल्फेटची फवारणी करावी. (५० ग्रॅम + १० लिटर पाणी)
बोरॉन झाडाचा शेंडा व कोवळी पाने पांढरट होऊन मरतात. सुरकत्या पडून पिवळे चट्टे पडतात. फळावर तांबडे ठिपके पडून भेगा पडतात. ५ ते १० ग्रॅम बोरीक असिड पावडरची १० लिटर पाण्यातून पानावर फवारणी करावी.
जस्त पाने लहान होऊन शिरामधील भाग पिवळा होतो. व पाने ठिकठिकाणी वाळलेले दिसतात. हेक्टरी १० ते २० किलो झिंक सल्फेट जमिनीतून देणे किंवा ५० ते १०० ग्रॅम झिंक सल्फेट १० लि. पाण्यातून पिकावर फवारावे.
मंगल पानांच्या शिरा हिरव्या व शिरामधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होतो व नंतर पांढरट व करडा होतो, संपूर्ण पान फिकट होवून नंतर पान गळते. हेक्टरी १० ते २५ किलो मँगेनीज सल्फेट जमिनीतून द्यावे किंवा १% मॅगेनीज सल्फेट फवारावे. (१०० ग्रॅम + १० लिटर पाणी)
मॉलिब्डेनम पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात. पानाच्या मागच्या बाजूने तपकिरी हेक्टरी २५० ते ५०० ग्रॅम सोडियम मॉलिब्डेट जमिनीतून द्यावे.
तांबे झाडांच्या शेंड्याची वाढ खुंटते, झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो. खोडाची वाढ कमी होते, पाने लगेच गळतात. मोरचूद ४० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
गंधक झाडांच्या पानांचा मुळचा हिरवा रंग कमी होतो व नंतर पाने पूर्ण पिवळी पांढरी पडतात. हेक्टरी २० ते ४० किलो गंधक जमिनीतून द्यावे.

अन्यथा अशा कुपोषित जमिनीत पिकाचे पोषण होणार नाही. त्याचा पिकांच्या वाढीवर उत्पादनावर आणि पौष्टिकतेवर अनिष्ट परिणाम होतो. पर्यायाने प्राणी मात्राच्या आरोग्यावरही परिणाम होवून अनेक प्रकारच्या आजारांना किंवा व्याधीना उदा. अशक्तपणा, मधुमेह, रक्तदाब, हाडाचे विकार, मुडदूस, सांधेदुखी, रोगप्रतिकारकशक्ती कमी होवून हृदय विकार इ. समस्यांना सामोरे जावे लागते. अशा अपौष्टिक अन्नपदार्थांचा अनिष्ट परिणाम विशेषत: बालवयात लहान मुलांमध्ये, गरोदर स्त्रियांमध्ये, वयस्कर माणसामध्ये असमतोल आहार घेतल्यामुळे प्रकर्षाने जाणवतो.

जनानरांमध्येही निकृष्ट चारा दिल्याने त्यांच्या वाढीवर, दुग्ध उत्पादनावर, अंडी व मांस देणाऱ्या कोंबड्यावरही परिणाम होत असतो. पर्यायाने प्राण्यांच्या सर्वांगीण वाढीवर, कार्यक्षमतेवर व आयुष्यमानावपही विपरीत परिणाम होत असतो.

आज जमिनीचा पोत व उत्पादकता कायम ठेवून, वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नधान्याचे विक्रमी गुणवत्तेदार उत्पादन करणे हे आपणा सर्वांपुढे आव्हान आहे.

नैसर्गिक संसाधनाचा एकात्मिक वापर तसेच जमिनीचे संधारण व संवर्धन करून इतर निविष्ठांचा काटेकोर कार्यक्षम वापर करण्यावर भर देणे गरजेचे आहे. कृषिक्रांती घडविण्यासाठी उत्पादकता, गुणवत्ता, नफा व सातत्य या बाबीवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी शेतकऱ्याने आधुनिक शेती तंत्राचा पुरेपुर वापर करण्याची नितांत गरज आहे.

पिकावर अवलंबून असणाऱ्या मानवासाठी तसेच जनावरासाठी त्यांच्या प्रदीर्घ आरोग्यासाठी गुणवत्तेदार उत्पादन मिळणे अत्यावश्यक आणि महत्वाचे आहे. त्यासाठी प्रथमत: जमिनीचे आणि पीक पद्धतीचे नियोजन व व्यवस्थापन करावे लागेल. अन्नधान्याच्या गुणवत्तेदार अधिक उत्पादनासाठी व जमिनीचे आरोग्य सांभाळण्यासाठी एकात्मिक पद्धतीमध्ये सेंद्रिय खताबरोबर हिरवळीचे खत, जीवाणू खते तसेच माती परिक्षणानुसार पिकांच्या अपेक्षित उत्पादनासाठी संतुलित रासायनिक खतांचा, दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, भू-सुधारकांचा वापर, योग्य पीक पद्धतीचा अंतर्भाव फेरपालटीत करावा. ज्यामुळे परस्परांवर अवलंबित जनावरे व मानवी जीवन निरोगी व सुसह्य दीर्घायुषी होईल.

Written by – विजयराज पाटील, सहयोगी उपाध्यक्ष, दीपक फर्टिलायझर्स, पुणे

About The Author
Mahadhan SMARTEK
One stop solution
for all
farming needs
Download Mahadhan App